- April 24, 2023
- No Comment
गोमांस घेऊन जाणारा आरोपी जेरबंद
कीवळे: धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा टेम्पो किवळे येथे पकडण्यात आला. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलिसांनी गुरुवारी (दि. 20) पहाटे तीन वाजता किवळे येथे ही कारवाई केली. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक करत त्याच्या ताब्यातून 27 लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
दिपक रफिक पैगंबर (वय 28, रा. सोलापूर) असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 27, रा. पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक टेम्पो परांडा येथून मुंबईकडे गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. हा टेम्पो किवळे येथून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणार असल्याचे समजताच गोरक्षकांनी देहूरोड पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी किवळे येथील ब्रिज परिसरात सापळा लाऊन एमएच 04/सीएम 0182 हा टेम्पो पकडला.
टेम्पोची तपासणी केली असता त्यात 12 लाख 60 हजार रुपये किमतीचे गोवंश सदृश जनावर कापून त्याचे मांस विक्रीसाठी नेले जात असल्याचे उघडकीस आले. टेम्पो चालक दिपक याच्याकडे मांस वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी 15 लाखांचा टेम्पो आणि 12 लाख 60 हजारांचे गोमांस असा एकूण 27 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.