आता एका क्लिकवर रेशनकार्ड मिळणार; असे असणार शुल्क, पहा सविस्तर!
- देश
- April 24, 2023
- No Comment
पुरवठा विभागाकडून मिळणारी शिधापत्रिका अर्थात् रेशनकार्ड म्हणजे नागरिकांसाठी शासनाचा अधिकृत पुरावा..! योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात.
तो त्रास कमी करण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने रेशनकार्ड सुविधा देण्यात येणार आहे. दरम्यान, ही चांगली सुविधा असली, तरी त्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे.
राज्यात १ फेब्रुवारी २०१४ पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील ६२ टक्के म्हणजे सुमारे ७ कोटी लोकसंख्या अनुदानित दराने धान्य मिळण्यास पात्र असून, सुमारे ४.७० कोटी ग्रामीण व सुमारे २.३० कोटी नागरी लोकसंख्येचा यात समावेश आहे.
अधिनियमांतर्गत लाभार्थ्यांचे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, नावात दुरुस्ती, पत्ता बदल व नाव वाढविणे, कमी करणे या बाबी ऑनलाईन करुन घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुविधा तयार केली असून, तपासणीअंती जनतेकरिता उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता क्यूआर कोड आधारित ई शिधापत्रिका ऑनलाईन तसेच, डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर शिधापत्रिकेवर योजनेबाबत अंत्योदय अन्न शिधापत्रिका, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व राज्य योजनेंतर्गत एपीएल शेतकरी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त असे नमूद करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या प्रस्तावानुसार ई-शिधापत्रिका सुविधाकरिता सेवानिहाय सेवा शुल्क आकारण्याचा निर्णय झाला आहे.
यानुसार अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार सेवा शुल्क आकारले जाईल व ऑनलाईन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ई-शिधापत्रिका डाऊनलोड करण्याची सेवा निःशुल्क असेल. कामाचा व्याप, ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्याचा त्रास, तसेच कार्यालयात चकरा मारणाऱ्यांना या सुविधांचा नक्कीच लाभ होणार आहे. शिवाय घरबसल्या शिधापत्रिका देखील मिळू शकणार आहे. मात्र, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, हे नक्की!
असे लागेल शुल्क!
* रेशनकार्ड प्रकार ऑनलाईन शुल्क (रूपये)
* अंत्योदय अन्न योजना २५
* प्राधान्य कुटुंब योजना ५०
* एपीएल शेतकरी ५०
* राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी व्यतिरिक्त ५०
* एपीएल शेतकरी १००
