- April 24, 2023
- No Comment
स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश,चार पिडीत महिलांची सुटका
वाकड: स्पा सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला. एका महिलेला पोलिसांनी अटक केली असून यामध्ये चार पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई ओंकार कॉलनी मधील कनक स्पा सेंटर येथे करण्यात आली.
पोलिसांनी एका महिलेला (वय 31, रा. नितीन हिंगोले यांच्या खोलीत, वाकड) अटक केली आहे. तिच्यासह स्पा सेंटरची मालक असलेल्या महिलेच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 370, 370 (अ) (2), 34, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्त मंदिर रोडवरील ओंकार कॉलनी मध्ये कनक स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये अटक केलेल्या आरोपी महिलेने कल्याण येथील दोन, खडकी बाजार आणि पिंपरी येथील दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्पा सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. कनक स्पा मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पिडीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपी महिलेने तिची उपजीविका भागवली असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.