- April 29, 2023
- No Comment
गुन्हे शाखेच्या पथकांचीदुचाकी चोरट्यांच्या विरुद्ध सर्वात मोठी कारवाई चोरट्यांकडून ५४ लाख ६७ हजार रुपयांच्या १६२ दुचाकी जप्त
पुणे : शहरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडलेला असताना गुन्हे शाखेच्या पथकांनी धडक कारवाई करुन शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यांना पकडले. पोलिसांनी चोरट्यांकडून ५४ लाख ६७ हजार रुपयांच्या १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यांच्या विरुद्ध सर्वात मोठी कारवाई आहे.
शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे वाढले आहेत. दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना दिले होते. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील युनिट सहा, पाच, चार, दोन आणि दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक दुचाकी चोरट्यांच्या मागावर होते. गु्न्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, नितीन मुंडे यांना दुचाकी चोरट्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने सचिन प्रदीप कदम (वय ३२, रा. कळंब, धाराशिव), अजय रमेशराव शेंडे (वय ३२, रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे), परमेश्वर भैरवनाथ मिसाळ (वय २८, रा. गोविंदपूर, ता. कळंब, जि. धाराशिव), युवराज सुदर्शन मुंढे (वय २३, रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे) यांना पकडले. चौकशीत चोरट्यांनी पुणे शहर परिसरातून चोरलेल्या दुचाकी आरोपी अजय शेंडे, शिवाजी गरुड यांना विक्रीसाठी दिल्याचे उघडकीस आले.