- May 7, 2023
- No Comment
आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी केली दहशत निर्माण
धनकवडी : आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत निर्माण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, त्याचीच पुनरावृत्ती शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास घडली.
सिंहगड इंन्स्टिट्युटच्या कॅम्पसमध्ये सहा जणांच्या टोळक्याने दहशत माजवली. दरम्यान घटनेची खबर मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मधील रात्र गस्तीवरील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचा आक्रमकपणा पाहून सहाही तरुणांनी घाबरुण जागेवरच दुचाकी आणि हत्यारे टाकत पळ काढला. या प्रकरणी पोलीस नाईक अविनाश रेवे यांनी फिर्याद दिली असून त्यानूसार पोलिसांनी सहा अज्ञात तरुणांविरुध्द दहशत माजवणे, आर्म ऍक्ट आणि इतर कलमांनूसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन केटीएम आणि एक पल्सर दुचाकी (तीघांची किंमत तीन लाख), दोन पालघण आणि ऍपल कंपनीचे दोन आयफोन असा तीन लाख ५५ हजार रुपये किंमतींचा ऐवज हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सिंहगड इंन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कॉलेजच्या मागे पार्किंगच्या जागेमध्ये तीन दुचाकीवरुन सहा जण दाखल झाले होते. त्यांच्या हातात मोठे पालघण होते. ते तेथे दहशत पसरवत होते. याची खबर नियंत्रण कक्षा तून मिळताच रास्त गस्तीवरील मार्शल दुचाकीवरुन तेथे दाखल झाले. अचानक आलेल्या पोलिसांना पाहून आरोपींची तारांबळ उडाली. त्यांनी गाड्या आणि पालघण तेथेच सोडून दिसेल त्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. यानंतर उपनिरीक्षक अंकुश कर्चे यांचे पथकही घटनास्थळी पोहचले. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.