- June 28, 2023
- No Comment
चार पिस्टल व 14 जिवंत काडतुसासह दोघांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाची कामगिरी
तळेगाव: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत त्यांनी दोघांना चार पिस्टल व 14 जिवंत काडतुसासह अटक केली आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आरोपी हे तळेगाव येथील किशोर आवारे यांच्या खूनाचा बदल्याच्या तयारीत होते.
प्रमोद सोपान सांडभोर (वय 33, रा. हरणेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे) आणि शरद मुरलीधर साळवे (वय 30, रा. धनगर बाबा मंदिराच्या मागे काळेवाडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, यांना शस्त्र पुरवणाऱ्या तिघांचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना खबर मिळाली सराईत आरोपी प्रमोद सांडभोर हा रविवारी तळेगाव दाभाडे बस स्टॅन्डजवळ शस्त्रासह येवून ते मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. अशी खबर मिळाली. त्यानुसार रविवारी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी बस स्टँड परिसरात सापळा लावला.
आरोपी हे निळ्या रंगाच्या अल्टो कारमधून खाली उतरले. त्यांच्या कंबरेला पिस्टल असुन पोलिसांचा सुगावा लागताच ते दोघे वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना अटक केली. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता दोन पिस्टल, 4 जिवंत काडसुते मिळाली तर कारची तपासणी केली असता त्यात दोन आणखी पिस्टल व 10 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.
पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 60 हजारांची शस्त्रे व 1 लाख रुपयांची गाडी असा एकूण 2 लोख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
दोन्ही अटक आरोपी हे सराईत असून त्यांनी मध्यप्रदेशमधून इतर दोघांकडून पिस्टल व काडतुसे आणली होती. सांडभोर याच्या विरोधात खून, खूनाचा प्रयत्न असे 8 गुन्हे दाखल आहेत, तर साळवी याच्या विरोधात खून मारामारी, बलात्कार असे तीन गुन्हे दाखल आहेत.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तयारी करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या कटामध्ये आणखी तीन जण सहभागी असल्याचे समोर आले आहे. आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम करत आहेत.
सदरची कारवाई दरोडी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश हिंगे, विनोद वीर, सुमित देवकर, महेश खांडे, उमेश पुलगम, प्रवीण माने, राजेश कौशल्य, राहूल खरगे, समिर रासकर, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे व अमर कदम यांनी केली आहे.