- July 4, 2023
- No Comment
जुन्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

चिखली: पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी दुपारी रुपीनगर, तळवडे येथे घडली.
अनिल दत्तू साळुंके (वय 40, रा. अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश मटकर आणि त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आदित्य अनिल साळुंके आणि त्याचा मित्र कुणाल बामणे असे दोघेजण कामासाठी जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या आरोपींनी जुन्या किरकोळ वादातून फिर्यादी यांचा मुलगा आदित्य याच्यावर कोयत्याने डोक्यात व ठिकठिकाणी वार केले. तसेच इतर तीन साथीदारांनीही कोणत्यातरी हत्याराने आदित्यच्या पोटावर वार करत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.