- October 13, 2023
- No Comment
ललित पाटील प्रकरणात ‘ससून’च्या अधिष्ठात्यांच्या अडचणीत वाढ व्यवस्थापन संशयाच्या भोवऱ्यात

पुणे : अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने ससून रुग्णालयातून पलायन केल्याने रुग्णालयाचे व्यवस्थापन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कैदी रुग्णांना ससूनमध्ये विशेष वागणूक दिल्याचा आरोप होत आहे. यातच आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ललित पाटील प्रकरणात ससूनच्या अधिष्ठात्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे
ललित पाटील हा ससून रुग्णालयातील कक्ष क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. मागील काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. ससून रुग्णालयात बसून तो अमली पदार्थ तस्करी करीत होता. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच सव्वादोन कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. मात्र, नंतर लगेचच ससूनमधून ललित पाटीलने पलायन केले होते. या प्रकरणी पोलिसांसोबतच ससूनच्या व्यवस्थापनाकडे बोट दाखविले जात आहे
या प्रकरणी ससून व्यवस्थापनाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीने नेमकी चौकशी करून काय अहवाल दिला, याबद्दल ससून व्यवस्थापनाकडून गोपनीयता बाळगली जात आहे. दरम्यान, आमदार धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर धंगेकर यांनी बुधवारी थेट पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
धंगेकर यांनी म्हटले आहे की, अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयात अनेक महिने उपचार घेत होता. त्याच ठिकाणाहून तो तस्करी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. ललित पाटील याच्यावर उपचार करणारे ६ डॉक्टर वेगवेगळ्या आजारांचे कारण पुढे करून त्याचा ससूनमधील मुक्काम वाढविण्याचा प्रयत्न करीत होते. गुन्हेगारास गुन्ह्यासाठी मदत करणे व त्याला मदत पोहचविणे हा एक प्रकारचा गुन्ह्याचाच भाग आहे. त्यामुळे या प्रकरणी या ६ डॉक्टरांसह ससूनचे अधिष्ठाता आणि अधीक्षक यांना सहआरोपी करावे
अमली पदार्थांच्या माध्यमातून तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या ललित पाटीलला मदत करणारे डॉक्टरही या प्रकरणात तेवढेच दोषी आहेत. त्यामुळे त्याच्यावर उपचार करणाऱ्या ६ डॉक्टरांसह ससूनच्या अधिष्ठात्यांना सहआरोपी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा




