- October 17, 2023
- No Comment
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण : आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबर २०२३ रोजी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेला. ललित पाटीलचा अद्याप पोलिस शोध घेत आहेत. त्याच दरम्यान ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना अटक करण्यात आली होती. त्या दोघांची आज पोलीस कोठडी संपत आल्याने त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबर २०२३ रोजी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा पळून जाण्याची घटना घडली. या घटनेला तेरा दिवसांचा कालावधी झाला असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. त्याच दरम्यान पुणे पोलिसांनी आरोपी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना १० ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश येथून अटक केली होती. त्यानंतर दोघा आरोपींना ११ ऑक्टोबरला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपींची पोलीस कोठडी संपत आल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते
त्यावेळी तपास अधिकारी न्यायाधीशांना माहिती देताना म्हणाले की, दोन्ही आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्या दरम्यान अभिषेक बलकवडे याच्या घरातून ३ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. तर ८ पेन ड्राईव्ह देखील जप्त करण्यात आले आहेत. तसेच ललित पाटीलसह एकूण ८ आरोपी आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत. तर ललित पाटील सह 6 आरोपीना अटक करायची असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तर आरोपी ड्रग्स कसे बनवायचे, त्याचा फार्मूला काय आहे, यासाठी पोलीस कोठडी वाढवून मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला
त्यावर आरोपीच्या वकिलांनी तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ‘मागील ६ दिवसांत तपास पूर्ण व्हायला पाहिजे होता. अनेक गोष्टी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे आणखी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही’, अशी बाजू आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यावर न्यायाधीशांनी २० ऑक्टोबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे




