- October 17, 2023
- No Comment
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात दोन गटांत जोरदार हाणामारी;३६ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. देवाच्या मुर्तीवर अभिषेक, पुजा करुन फुले वाहणाऱ्या पुजाऱ्यांनी पुजेच्या संधीवरुन एकमेकांवर लाठ्या काठ्यानी आणि लोखंडी रॉडने हल्ला करीत मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार भीमाशंकर मंदिर परिसरात सोमवारी घडला आहे.
या प्रकारावरून दोन्ही बाजूच्या ३६ पुजाऱ्यांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शंकर गंगाराम कौदरे (वय ६५, रा. खरोशी, ता खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ जणांविरोधात तर गोरक्ष यशवंत कौदरे (वय ४०, रा. भिमाशंकर, ता खेड) यांच्या तक्रारीवरुन विरोधी गटातल्या १५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, भीमाशंकर मंदिर गाभारा तसेच परिसरात असलेल्या शनी मंदिरात पुजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये वाद आहेत. सोमवारी दुपारी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असताना हा वाद झाला. त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. एका गटातील जमावाने पुजेला बसलेल्या पुजाऱ्यांना जबरदस्तीने उठवून येथील ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या काठ्या, लोखंडी पाईप तसेच एकमेकांना खुर्च्या मारून जखमी करण्यात आले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे अधिक तपास करीत आहेत




