- October 26, 2023
- No Comment
जुन्या भांडणाच्या वादातून हडपसरमध्ये 22 वाहनांची तोडफोड
पुणे : पुण्यात कोयत्या गँगची दहशत अद्याप कमी झालेली दिसत नाही. शहराच्या विविध भागात कोयता गँगकडून दहशत निर्माण केली जात आहे. हडपसर परिसरातील गोसावी वस्ती वैद्यवाडी येथे जुन्या भांडणातून टोळक्याने हातात धारदार शस्त्रे घेऊन 22 वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.
याबाबत रोहीत भारत गायकवाड (वय-24 रा. सर्वे नंबर – 106, गोसावी वस्ती, हनुमान मंदीराजवळ, वैद्यवाडी, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश जावळे, युवराज बदे, सुरज पंडीत, समीर शेख, अक्षय राऊत यांच्यासह 3-4 अनोळखी व्यक्तींवर आयपीसी ३९५,३२३,४२७,५०४,५०६, आर्म ॲक्ट ४/२५, क्रिमीनल लॅा अमेंडमेंट कलम ७, ८, महाराष्ट पोलीस अधिनियम ३७(१)(३)/१३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर यश जावळे, सुरज पंडीत, अक्षय राऊत यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी व त्यांच्या वडिलांना
शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. आरोपींनी धारदार हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी
दिली. तसेच जबरदस्तीने 30 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन, अंगठी व रोख रक्कम चोरुन नेली. टोळक्याने हातातील धारदार हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण करुन पार्क केलेल्या 22 वाहनांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहित गायकवाड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दोरकर करीत आहेत