- December 7, 2023
- No Comment
ललित पाटील प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षकासह दोघे बडतर्फ
पुणे : अमली पदार्त तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी कर्तव्यात हलगर्जी केल्याच्या ठपका ठेवून महिला पोलीस उपनिरीक्षकासह दोघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलीस दलातील चार पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक फौजदाराला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, सहाय्यक फौजदार जनार्दन काळे अशी बडतर्फ केलेल्यांची नावे आहेत. २९ सप्टेंबर रोजी ससून रूग्णालयाच्या परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांच्याकडून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. ससून रूग्णालयातील कैदी उपचार कक्षात (वॉर्ड क्रमांक १६) उपचार घेणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मेफेड्रोन विक्रीत सामील असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी ललितसह तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ललित वाॅर्ड क्रमांक १६ मधून बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता
त्यानंतर वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. बंदोबस्तात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून दहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी पोलीस नाईक नाथाराम भारत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव यांना अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर दोघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले. कर्तव्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि जनार्दन काळे यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशीत दोषी आढळल्यानंतर डोंगरे आणि काळे यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. पाटीलला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली, तसेच कारागृह रक्षक मोईस शेखला अटक करण्यात आली आहे