- December 8, 2023
- No Comment
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’!
पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या योगेश उर्फ सॅम सोनवणे व त्याच्या साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 94 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.
फिर्यादी महिला त्यांच्या कार्यालयाच्या समोरुन जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेले होते. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आहे. या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी टोळी प्रमुख योगेश उर्फ सॅम जगदिश सोनवणे (वय-23) व राहुल मच्छिंद्र कांबळे (वय-24) या दोघांना अटक करुन गुन्ह्यातील मंगळसुत्र व गुन्हा करताना वापरलेली अॅक्सेस मोपेड जप्त केली आहे. आरोपींनी ही दुचाकी कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
खडकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे करीत आहेत.