- December 8, 2023
- No Comment
देशभरताली गुंतवणुकदारांची पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या समृद्ध जीवन घोटाळ्यातील फरार आरोपीला सीआयडी कडून अटक
पुणे : देशभरताली गुंतवणुकदारांची पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या समृद्ध जीवन घोटाळ्यातील फरार आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आरोपी सात वर्षापासून सीआयडीला हुलकावणी देत होता. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.6) पुणे-सातारा रोडवर असलेल्या सिटीप्राईड सिनेमागृहाजवळ करण्यात आली. रामलिंग हिंगे (वय-56 रा. गल्ली नं. 3 गोकुळनगर, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
समृद्ध जीवन समूहाचा सर्वेसर्वा गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश मोतेवार याच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात 2016 साली आयपीसी 403, 406, 409, 120ब, 34 आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम सन 1999 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी रामलिंग हिंगे हा महेश मोतेवार याच्या जवळचा साथीदार आहे.
समृद्ध जीवन फुड्स इंडिया व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को ऑप सोसायटीचा सर्वेसर्वा महेश मोतेवार व रामलिंग हिंगे यांनी महाराष्ट्रात व संपूर्ण देशभरात कंपनीच्या अनेक शाखा उघडल्या. त्या माध्यमातून गुंतवणुकदारांची 4 हजार 725 कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंगे हा फरार झाला होता. मागिल 7 वर्षांपासून तो पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून राहत असल्याने मिळून येत नव्हता. रामलिंग हिंगे हा सातारा रोडवरील सिटी प्राईड येथे येणार असल्याची माहिती सीआयडी पथकाला मिळाली. त्यांनी हिंगे याला सापळा रचून ताब्यात घेतले.
समृद्ध जीवन समूहाविरुद्ध भारतभरात एकूण 26 गुन्हे दाखल आहेत. संपूर्ण भारतातील 64 लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची व महाराष्ट्रातील एकूण 18 लाख गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांतील एकूण 25 आरोपींपैकी महेश मोतेवारसह 16 जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.