- February 16, 2024
- No Comment
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातून तब्बल ३० लाख ४० हजार रुपये किमतीचे १५२ ग्रॅम वजनाचे कोकेन अंमली पदार्थ जप्त
पुणे: गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातून अमली पदार्थाची तस्करी करणार्या विदेशी नागरिकाला पकडले. त्याच्या ताब्यातून तब्बल ३० लाख ४० हजार रुपये किमतीचे १५२ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. हसेनी मुबीनी मीचॉगा (३५, मु. रा. टांझानिया) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की, एक परदेशी नागरिक कोंढवा परिसरात उंड्री येथे सार्वजनिक रस्त्यावर कोकेन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित परदेशी इसमाला ताब्यात घेतले. आरोपी हा मुळचा टाझांनिया येथील रहिवासी असून कामानिमित्ताने भारतात आला. उंड्री याठिकाणी तो सध्या राहत होता. परंतु अंमली पदार्थ विक्री करताना तो पोलिसांना मिळून आला आहे. पोलिसांनी आरोपीवर कोंढवा पोलिस ठाण्यात एनडीपीसी कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी दिली