- February 26, 2024
- No Comment
नविन दागिने बनवून देतो, असे सांगून त्यांच्याकडील जुने दागिने व पैसे घेऊन वाघोलीतील सराफ फरार
पुणे : केसनंद ते राहु रोडवरील शिरसवडी येथे त्याने महालक्ष्मी ज्वेलर्स नावाने सराफी दुकान सुरु केले. लोकांना नविन दागिने बनवून देतो, असे सांगून त्यांच्याकडील जुने दागिने व पैसे घेतले. दागिने गहाण ठेवून उसने पैसे दिले, त्यानंतर तो सर्व काही घेऊन फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अमोल कुंडलिक पायगुडे (वय ३२, रा. पायगुडे वस्ती, वाडेबोल्हाई, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १७५/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन सुभाष क्षीरसागर (रा. शिवरकर वस्ती, वाघोली, मुळ रा. कुरंदा, ता. वसमत, जि. हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईने ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व ८० हजार रुपये हे ५ तोळे वजनाच्या बांगड्या बनविण्यासाठी डिसेबरमध्ये आरोपी क्षीरसागरकडे विश्वासाने दिल्या. परंतु, क्षीरसागरने नवीन बांगड्या बनवून दिल्या नाहीत. तसेच गावातील काही लोकांनी आरोपीकडे सोन्याचे दागिने देऊन दागिन्यांच्या किंमतीपेक्षा कमी पैसे उसने घेतले. लोकांचे हे दागिने घेऊन क्षीरसागर दुकान बंद करुन फरार झाला आहे. अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर लोकांनी आता पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करीत आहेत.