- February 28, 2024
- No Comment
पुण्यात वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या आखाती देशातील नागरिकांना लुटणारी दिल्लीतील टोळी गजाआड
पुणे : वैद्यकीय उपचारासाठी पुण्यात आलेल्या येमेनच्या नागरिकांना लुटणार्या दिल्ली येथील इराणी टोळीला कोंढवा पोलिसांनी दमण येथील एका हॉटेलमधून बेड्या ठोकल्या. अरबी भाषेत संवाद साधून पोलिस असल्याची बतावणी करत ही टोळी येमेन च्या नागरिकांना लुटत होती.
सिकंदर अली शेख (४४), करीम फिरोज खान (२९), इरफान हुसेन हाशमी (४४), मेहबुब अब्दुल हमदी खान (५९, सर्व रा. दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी ३ हजार अमेरिकी डॉलर, ५०० सौदी रियाल, ५३ हजारांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली दोन लाख रुपये किमतीची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
येमेन देशाचे नागरिक उपचारासाठी पुण्यात आल्यानंतर ते कोंढवा परिसरात वास्तव्यास असतात. त्यांना भारतीय भाषा येत नाही. तसेच त्यांचा पेहराव देखील वेगळा असतो, त्यामुळे ते इतरांच्या नजरेत येतात. सालेह ओथमान एहमद (५२) हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी पुण्यात आले होते. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी येथील आशीर्वाद चौकातून पायी चालत जात असताना, चौघा आरोपींनी त्यांना पोलिस असल्याची बतावणी करत लुटले होते. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, सहायक पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, अंमलदार सुहास मोरे आणि राहुल थोरात यांच्या पथकांना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीचे फुटेज मिळाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींच्या गाडीचा दमणपर्यंत माग काढून आरोपींना बेड्या ठोकल्या. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त आर. राजा, सहायक पोलिस आयुक्त गणेश पिंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे, गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, कर्मचारी अमोल हिरवे, जयदेव भोसले, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत रत्नपारखी, अभिजित जाधव, शशांक खाडे, विकास मरगळे, रोहित पाटील यांच्या पथकाने केली