- December 5, 2024
- No Comment
मारणे टोळीच्या राकेश मारणे विरुद्ध गुन्हा दाखल! व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा आरोप
पुणे : व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन स्टॅम्प ड्युटीसाठी १० लाख ५० हजार रुपये घेऊन सिक्युरिटी म्हणून घेतलेल्या धनादेशपैकी एकावर २ लाख ३० हजार रुपयांची रक्कम टाकून परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहकारनगरमधील एका ६२ वर्षाच्या व्यावसायिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राकेश विठ्ठल मारणे (रा. रिजेंट पार्क, बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राकेश मारणे याने दोन वर्षांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाला मारणे
टोळीची भिती दाखवून जीवे मारण्याची धमकी देत १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकारही डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान सदाशिव पेठेतील माधव हेरिटेज येथे घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरंभ लक्ष्मी निधी लिमिटेड या फायनान्स कंपनीमधून ३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो, असे राकेश मारणे याने सांगितले. त्यांच्याकडून स्टॅम्प ड्युटीसाठी १० लाख ५० हजार रुपये फोन पे व आर टी जी एस द्वारे तीन टप्प्यात स्वत:च्या बँक खात्यावर घेतले. फिर्यादी यांच्याकडून सिक्युरिटी म्हणून १२ धनादेश घेतले होते. त्यापैकी एक धनादेश त्याची आई सुशिला मारणे यांच्या नावाने परस्पर बनवून घेतला. त्यावर २ लाख ३० हजार रुपये रक्कम टाकून ती फिर्यादी यांना काही एक न सांगता काढून घेतले आहेत. फिर्यादी यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. तरी ते कर्ज फिर्यादीच्या खात्यामध्ये अद्याप जमा न करुन राकेश मारणे याने फिर्यादीची १२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करीत आहेत.