- December 11, 2024
- No Comment
स्वारगेट एस टी बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या हातातून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणारा चोरटा गजाआड
पुणे : स्वारगेट एस टी बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या हातातून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दीड लाख रुपयांचे ६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. प्रतिक विजय माने (वय २४, रा. डेरे बंगला, मांजरी, मुळ रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे या चोरट्याचे नाव आहे. प्रतिक माने याला पुणे
जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार करण्यात आले आहे.
स्वारगेट एस टी बसस्थानकाबाहेर उभे असताना दोन चोरट्याने भरधाव येऊन तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. स्वारगेट पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी वारंवार गस्त घालून सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलीस अंमलदार प्रतिक लाहिगुडे संदीप घुले यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्क आऊट केले.
या दरम्यान, पोलीस अंमलदार सुजय पवार, फिरोज शेख व हर्षल शिंदे यांना बातमी मिळाली की, एक संशयित आरोपी हा कात्रज पीएमपी बसस्टॉपजवळ फिरत आहे. त्यानुसार तातडीने पोलिसांनी तेथे जाऊन प्रतिक माने याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ ३ मोबाईल आढळून आले. त्यातील एक मोबाईल फिर्यादीचा असल्याचे दिसून आले. अधिक चौकशीत त्याने साथीदार करण घाडगे (रा. मांजरी) यांनी मिळून स्वारगेट व हडपसर परिसरातून आणखी ३ मोबाईल हिसकावून चोरी केल्याचे सांगितले. हे
मोबाईल ओळखीच्या लोकांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आणखी ३ मोबाईल हस्तगत केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, हवालदार अश्रुबा मोराळे, सचिन तनपुरे, मारकड, प्रतिक लोहिगुडे, पोलीस अंमलदार सुजय पवार, हर्षल शिंदे, फिरोज शेख, दुधे, रमेश चव्हाण, प्रशांत टोणपे, दिपक खेंदाड, संदीप घुले यांनी केली आहे.