- December 14, 2024
- No Comment
केसनंदमधील आर्यन बिअरबार समोरील घटना पिस्टलमधून गोळीबार, रुग्णवाहिकेची तोडफोड
पुणे : व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकावर पिस्टलातून गोळीबार करुन रुग्णवाहिकेवर दगडफेक करुन तिची तोडफोड करण्यात आली. वाघोली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याबाबत सुधाकर अरुण कानडे (वय ३५, रा. कात्रज) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विशाल रामदास कोलते (रा. बकोरी, ता. हवेली), संदिप कैलास हारगुडे (रा. केसनंद, ता. हवेली), अमोल हारगुडे (रा. केसनंद, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. हा प्रकार केसनंद येथील आर्यन बिअरबार समोर घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन बिअर बारमध्ये विशाल कोलते, संदिप हारगुडे, अमोल हारगुडे हे दारु पित बसले होते. यावेळी संदिप हारगुडे याच्या पत्नीने जागृती व्यसनमुक्ती केंद्राकडे संदिप हारगुडे याला व्यसनमुक्तीसाठी घेऊन जाण्याची विनंती केली. त्यानुसार रुगणवाहिका घेऊन फिर्यादी आपल्या सहकार्यांसह आर्यन बिअर बारबाहेर आले. संदिप हारगुडे यांना घेऊन जात असताना त्यांनी विरोध करुन विशाल कोलते याला चिथावणी दिली. तेव्हा विशाल याने त्याच्याकडील पिस्टलमधून दोन गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तिघांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक करुन तिची तोडफोड केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, संदीप भाजीभाकरे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, रामकृष्ण दळवी, मनोज बागल यांनी भेट दिली. पोलिसांनी तिघांनावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करीत आहेत.