- December 19, 2024
- No Comment
तडीपार गुंड जेरबंद, सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी
सिंहगड रोड: तडीपार केले असतानाही पुण्यात येऊन कोयता घेऊन फिरणार्या गुंडाला सिंहगड रोड पोलिसांनी पकडले. परशुराम ऊर्फ बाळा गणपत राऊत (वय २८, रा.आनंद विहार, हिंगणे खुर्द) असे पकडलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.
याबाबत पोलीस अंमलदार विनायक दत्तात्रय मोहिते यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार हिंगणे खुर्द येथील आनंद विहार गणपती मंदिराजवळ मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम राऊत त्याच्याविरुद्ध अनेक शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी परशुराम राऊत याला २५ ऑगस्ट २०२४ पासून एक वर्षाकरीता तडीपार केले होते. असे असतानाही तो पुणे शहरात आला होता.
तडीपार गुंड हिंगणे खुर्द येथे थांबला असून त्याच्याकडे कोयता आहे, कोणता तरी गुन्हा करण्याचा त्याचा उद्देश आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलीस पथक तेथे गेले. त्यांनी कोयत्यासह परशुराम राऊत याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक निकम तपास करीत आहेत.