- December 20, 2024
- No Comment
मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास
पुणे: सावत्र वडीलांकडून होणार्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढव्यातील लक्ष्मीनगर भागात घडली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकणी सावत्र वडीलांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय सुमतराव कसोटे (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर, संदीप ऊर्फ शब्बीर इब्राहिम शेख (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत संदीपच्या ५१ वर्षीय मावशीने फिर्याद दिली आहे. कोंढव्यातील लक्ष्मीनगर येथे ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीने दुसरा विवाह केला आहे. शब्बीर हा मिळेल ते काम करायचा. सावत्र वडील विजय हे शब्बीरला मानसिक त्रास देत असत. या त्रासाला कंटाळून शब्बीर याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शब्बीरच्या खिशात चिढ्ढी आढळली. त्यात त्याने आपल्या सावत्र वडिलांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्यानूसार पोलिसांनी सावत्र वडील कसोटे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर पुढील तपास करीत आहेत.