- December 20, 2024
- No Comment
महाविद्यालयीन बेकायदा पिस्तूल बाळगणारा तरुण जेरबंद; आंबेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पुणे: बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला आंबेगाव (भारती विद्यापीठ) पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, एक काडतूस असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक शरद झिणे यांनी दिली.
आर्यन बापू बेलदरे (वय १९, रा. आई श्री व्हिला अपार्टमेंट, आंबेगाव बुदुक) असे अटक महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव पोलीस ठाण्याचे पथक हद्दीतील दत्तनगर परिसरात गस्त घालीत होते. बेलदरे याच्याकडे बेकायदा पिस्तूल असून तो आई श्री अपार्टमेंटजवळ असलेल्या गोठ्यात उभा असल्याचे खबऱ्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने हालचाली केल्या. तात्काळ आई श्री अपार्टमेंटजवळ पोलिसांनी धाव घेतली. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस आढळून आले. त्याच्याकडे पोलिसांनी हे पिस्तूल कुठून आणले याबाबत चौकशी केली. त्यावेळी हे पिस्तूल एका महाविद्यालयीन तरुणाकडून खरेदी केल्याचे सांगितले. या पिस्तूलाची तो जादा दराने अन्य एका व्यक्तीला विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिणे, सहायक निरीक्षक प्रियंका गोरे, पोलिस कर्मचारी शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, विनायक पाडळे यांनी ही कामगिरी केली.