- December 21, 2024
- No Comment
पोलिसांचा नळस्टॉप-डेक्कनच्या चौपाटयांना मोठा दणका रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विक्री सुरू ठेवणे पडले महागात
पुणे: कर्वे रस्त्यावर नळ स्टॉप चौकात पहाटेपर्यन्त विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री करणे व्यावसायिकांना चांगलेच भोवले आहे. वारंवार सूचना देऊनही खाद्य पदार्थांचे स्टॉल वेळेत बंद न केल्यामुळे पोलिसांनी आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.
डेक्कन पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान कारवाई करीत नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस हवालदार प्रमोद तानाजी दोडके (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, व्यंकटेश गायकवाड (वय २३, रा. जयदेवनगर, सिंहगड रोड), विनोद भंगारदिवे (वय ४२, रा. उत्तमनगर, एनडीए रोड), प्रथमेश पवार (वय २४, रा. खिलारेवाडी, कर्वे रस्ता), सचिन घोडके (वय २७, रा. पीएमपीबी, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे), संदीपसिंह (वय १९, रा. नळस्टॉप), महेश बाबू (वय २७, रा. मावळे आळी, कर्वेनगर) यांच्यावर भारतीय दंड संहिता २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड, भिंगारदिवे, पवार, घोडके आणि संदीपसिंह यांनी कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौकात रात्री उशिरापर्यंत खाद्य पदार्थ दुकाने उघडी ठेवली. तसेच, वारंवार तोंडी आदेश देऊन देखील नियमानुसार, या आस्थापना वेळेत बंद केल्या नाहीत. या आस्थापना अटी व शर्तीपेक्षा अधिक वेळ विनापरवाना सुरू ठेवून ग्राहकांना खाद्यपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, पोलीस शिपाई नागनाथ म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रवी डोंगरे (वय ३६, रा. चव्हाणनगर, धनकवडी), आसाराम वर्मा (वय ३०, रा. खिलारेवाडी, कर्वे रस्ता), साहिल तिकोणे (वय २४, रा. वनाज कॉर्नर, कोथरूड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर, जंगली महाराज रस्त्यावरील ‘आर. डेक्कन मॉल’समोरील चौपाटीवर देखील कारवाई करण्यात आली आहे. डोंगरे, वर्मा, तिकोणे यांनी डेक्कन येथे मध्यरात्री उशीरापासून ते पहाटेपर्यन्त चौपाटीवर खाद्य पदार्थ आस्थापना सुरू ठेवल्या. पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे उल्लंघन केले. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांना खाद्यपदार्थांची विक्री केली. पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात आले.