- December 22, 2024
- No Comment
पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार २०० सीएनजी बस
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कंपनीच्या ताफ्यात लवकरच २०० सीएनजी बस दाखल होणार असून, टाटा कंपनीच्या बस खरेदी करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
पीएमपीसाठी २०० सीएनजी बस खरेदी करण्याची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू होती. बस खरेदीसाठी यापूर्वी देखील निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्या वेळी अशोक लेलँड या कंपनीने बसची किंमत साधारण ६७ लाख रुपये कोट केली होती तसेच काही कालावधीसाठी देखभाल दुरुस्तीची तयारी दर्शविली होती.
ही रक्कम अधिक असल्याने काही अटी-शर्तींमध्ये बदल करून फेरनिविदा काढण्यात आली. त्यामध्ये टाटा कंपनीची ४७ लाख रुपये प्रतिबस, अशी सर्वात कमी किंमत आली. या कंपनीच्या निविदेला शुक्रवारी झालेल्या पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पीएमपीएमएल कंपनीला अर्थपुरवठा करण्यात पुणे महापालिकेचा ६० टक्के, तर पिंपरी-चिंचवडचा ४० टक्के हिस्सा आहे.
परंतु, पीएमआरडीएसह एमआयडीसी आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतही बससेवा पुरविण्यात येत आहे. कंपनीमध्ये पीएमआरडीएचे दायित्व निश्चित करण्यात आले आहे. मात्र, एमआयडीसी आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतील सेवेबद्दल कंपनीला संबधित संस्थांकडून कुठलीही आर्थिक मदत होत नाही. बस खरेदीसाठी या संस्थांनीही अर्थसाहाय्य करावे, अशा मागणीचे पत्र व्यवस्थापनाच्या वतीने पीएमआरडीए, जिल्हा परिषद आणि एमआयडीसीला देण्यात येणार असल्याचेही पृथ्वीराज यांनी सांगितले.
पीएमपीएमएलच्या भाडेदरात वाढीबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत कुठलीही चर्चा अथवा निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळातील खातेवाटपानंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थित भाडेवाढीबाबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.