- December 23, 2024
- No Comment
किरकोळ वादात पिस्तुलातून गोळीबार; कोंढव्यातील घटना
पुण्यात पुन्हा एकदा किरकोळ वादातून एकाने पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. २१) मध्यरात्रीच्या सुमारास कोंढव्यातील एका उपहारगृहाजवळ घडली आहे.
याप्रकरणी दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुला उर्फ बकलब कुरोशी (रा. सय्यदनगर, महंमदवाडी) याच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कौसरबाग परिसरात करीमस् कॅफे येथे शनिवारी रात्री ताहा शेख, नोमान पठाण, अब्दुला आणि आणखी एकजण जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अब्दुला याची मैत्रीण त्या ठिकाणी आली. अब्दुला आणि त्याची मैत्रीण थोड्या अंतरावर उभे राहून गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तिघे जण तेथे आले. अब्दुला आणि त्याच्या मैत्रिणीला रस्त्यात बोलत थांबू नका, असे त्यांनी सांगितले.
या कारणावरुन अब्दुला आणि तिघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तैमुरअली पठाण (रा. गल्ली क्रमांक १४, सय्यदनगर, हडपसर) याने मित्रांना बोलावून घेतले. दहशत माजविण्यासाठी त्यांनी तलवार उगारली, तसेच सिमेंटच्या गट्टूने करिमस् कॅफेसमोर लावलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. त्यावेळी अब्दुलाने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, अब्दुलाने पिस्तुलातून गोळीबार केल्याची माहिती तपासात मिळाली आहे.