- December 23, 2024
- No Comment
सॅलिसबरी पार्कमधील फ्लॅटमधून ५० तोळ्यांचे दागिने लंपास
पुणे: सॅलिसबरी पार्क परिसरातील फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी कपाटातील ५० तोळ्यांचे सोन्याचे व हिरेजडीत दागिने तसेच चांदीची लगड असा लाखो रुपये किमतीचा ऐवज पळवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.
सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी तपास जारी केला आहे. यासंदर्भात शीला सुशील जैन (वय ५७, रा. मार्बल हाऊस, सॅलिसबरी पार्क) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
जैन यांचे पती सुशील लष्कर भागातील एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. जैन आणि त्यांची मुलगी बुधवारी सकाळी घराजवळ असलेल्या जैन मंदिरात गेले होते. पतीकडे असलेली चावी घरात विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील चावी सदनिकेच्या बाहेर असलेल्या पादत्राणे ठेवण्याच्या जाळीत लपवून ठेवली होती. त्यांच्या घरावर पाळत ठेवलेल्या चोरट्याने चावी पळवून त्यांच्या घरातील दागिने व रोकड लांबवली. चोरटा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्याच्या वर्णनानुसार पोलिसांनी पुढील तपास जारी केला आहे.