- December 24, 2024
- No Comment
उरुळी देवाची- फुरसुंगीच्या नागरिकांची व्यथा, पालिकेकडे मोठी मागणी
पुणे: उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांतील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यावर या दोन्ही गावांसह समाविष्ट उर्वरित ३२ गावांसाठी मनपा आयुक्तांनी बैठक बोलावली होती.
त्यावर येथील नागरिकांनी अडचणी सांगत “आम्हाला वाऱ्यावर सोडू नका’ अशी आर्त मागणी बैठकीत मांडली.
मिळकतकर जास्त असल्याचे सांगत शासनाकडे मागणी करून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे महापालिकेतून बाहेर पडली. त्यानंतर तेथे नव्याने नगर परिषद स्थापन करण्यात आली. आता येथील नागरिकांना पाणी, ड्रेनेज, कचरा, रस्ते, आरोग्य अशा वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या दैनंदिन सुविधा कायम ठेवाव्यात, असे आदेश शासनाने महापालिकेस दिले आहेत.
शासनाने २०१७ मध्ये समाविष्ट केलेल्या ११ गावांमध्ये या दोन गावांचा समावेश आहे. येथे महापालिकेने मागील वर्षी पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छतेच्या निविदा काढल्या होत्या. मात्र, त्या मंजूर होण्यापूर्वीच शासनाने ही गावे महापालिकेतून वगळली. त्यामुळे महापालिकेने ही कामे थांबवली. त्यानंतर शासनाने या गावांची नगर परिषद केली.
मात्र, ही नवीन नगर परिषद असल्याने शासनाने विशेष आदेश काढत विभागीय आयुक्तांंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमत गावांचे हस्तांतरण टप्प्याटप्प्याने करावे, अशा सूचना केल्या. तसेच तोपर्यंत महापालिकेने दैनंदिन कामे कायम सुरू ठेवावीत, असे आदेश दिले. त्यामुळे महापालिकेने मोठी कामे थांबवली.
तसेच शासनाकडे पत्र पाठवत या बाबत मार्गदर्शन मागितले. मात्र, शासनाने त्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. परिणामी, महापालिकेने मोठी कामे निविदांप्रमाणेच करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.