- December 24, 2024
- No Comment
करण बोथराबाबत पुणे पोलिसांनी सर्व विमानतळांवर दिला ‘अलर्ट’;26 कोटींचे फसवणूक प्रकरण!

पुणे: स्टील व्यवसायात गुंतवणुक करण्यास भाग पाडून बांधकाम व्यावसायिकाला २६ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणातील मुख्य संशयित करण दिलीप बोथरा (रा.पितळेनगर, सॅलिसबरी पार्क) हा परदेशात पळून जाऊ नये, म्हणून पुणे पोलिसांनी सर्व विमानतळावर अलर्ट दिला आहे.
स्टील व इतर मेटल धातूच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुक करायला भाग पाडून २६ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नवीन सुरेश अगरवाल (रा. गणेशखिंड रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे यांनी सांगितले की, स्टील व्यवसायात गुंतवणुक करण्यात भाग पाडून २६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी करण बोथरा यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. त्यांनी आपण बाहेरगावी असून २ -३ दिवसात येतो, असे सांगितले आहे. आरोपी परदेशात पळून जाऊ नये, म्हणून सर्व विमानतळावर अलर्ट सूचना देण्यात आली आहे.
फिर्यादी यांची पर्पल कन्स्ट्रक्शन प्रा. लि. ही कंपनी आहे. व्यवसायानिमित्ताने त्यांची करण बोथरा याच्याशी ओळख झाली. बोथरा याने त्याचे स्टील व इतर मेटलमध्ये धातू खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, असे सांगितले. तसेच फियार्दी यांना वेळोवळी गुंतवणुक करण्यास भाग पाडले. गुंतवणुकीची व त्यावरील होणार्या फायद्याची रक्कम चेकद्वारे डिक्लरेशन कम अंडर टेकिंग दस्त लिहून दिला. तरीही त्यांना पैसे परत न करता फियार्दी यांचा विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केली.





