- December 24, 2024
- No Comment
सायबर चोरट्यांमुळे पुणेकर त्रस्त; सहा जणांना घातला एक कोटीचा गंडा
पुणे: पुण्यातील सायबर फसवणुकीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. आर्थिक प्रलोभनाला बळी पडून पुणेकर लाखो रुपये सायबर ठगांच्या हवाली करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. विविध घटनांमध्ये सहा जणांना सायबर चोरट्यांनी ९७ लाख ६३ हजार रुपयंचा गंडा घातला आहे.
याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रूम बुक करण्याच्या बहाण्याने फसवणूक:
पहिल्या घटनेत सिंहगड रोड परिसरातील ५९ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी रूम बुक करण्याच्या बहाण्याने २२ लाख ८९ हजार ४९० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींना गिरणार गुजराथ येथे धार्मिक कार्यासाठी जायचे होते. त्यासाठी त्यांना तेथे रूम बुक करायची होती. ऑनलाइन संकेतस्थळावरून रूम बुक करत असताना, फिर्यादी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकले अन् पैसे हवाली करून बसले.
गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा:
दुसऱ्या घटनेत लोहगाव येथील २५ वर्षीय तरुणाला टास्क फ्रॉडद्वारे २९ लाख ६० हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत तरुणाच्या फिर्यादीनुसार विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या घटनेत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत पवार वस्ती लोहगाव येथील ३४ वर्षीय व्यक्तीची ९ लाख रुपयांना गंडा घातला आहे.
याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाघोली लोणीकंद येथील २६ वर्षीय तरुणीचीदेखील सायबर चोरट्यांनी अशाचप्रकारे १० लाख ३० हजारांची फसवणूक केली आहे. खांदवेनगर वाघोली येथील ६३ व्यक्तीला शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपयांना गंडा घातला आहे.
चौथ्या घटनेत नगर रोड वाघोली येथील ५४ वर्षीय महिलेलासुद्धा शेअर मार्केटच्या बहाण्याने १५ लाख ८४ हजार रुपयांना गंडविण्यात आले आहे. याबाबत लोणीकंद वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.