- December 24, 2024
- No Comment
वाघोलीतील दुर्घटनेने ससूनही गहिवरले; जखमी आणि मृत हे एकाच कुटुंबातील
पुणे: वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडल्याची दुर्घटना घडली. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेतील सहा जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ससूनमधील जखमींपैकी 19 वर्षीय तरुणीच्या पोटावरून डंपरचे चाक गेल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. दुसर्या 18 वर्षीय युवतीच्या माकडहाडाला इजा झाली असल्याने तीही बर्यापैकी जखमी झाली आहे. तर उर्वरित चार जणांच्या पायाला, हाताला इजा झाली असली, तरी त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
जानकी पवार (वय 19), नागेश पवार वय (वय 20), रेनिशा पवार (वय 18) यांच्यावर शल्यचिकित्सा (सर्जरी) विभाग तर रोशन भोसले (वय 7), सुदर्शन वैराट (वय 18) आणि अलिशा पवार वय (वय 50) यांच्यावर अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) विभागात उपचार सुरू आहेत.
जानकी पवार (वय 19) हिला सोमवारी पहाटे तीन वाजता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी चार तास शर्थीचे प्रयत्न करत शस्त्रक्रिया करून श्वासपटल पुन्हा जोडले. सकाळी सात वाजता शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया अकरा वाजता पूर्ण झाली.
त्यानंतर पुढील उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल आले असून, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव यांनी दिली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वर्षांचा वैभव पवार, एक वर्षाची वैभवी पवार आणि 22 वर्षीय विशाल पवार यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन सकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाले होते.
परंतु, जखमी आणि मृत हे एकाच कुटुंबातील असल्याने त्यांचे नातेवाईक हे जखमींकडे पाहणे, मृतदेहांचे मृत्यू पास घेणे यासाठी पळापळ करत होते. दुपारनंतर नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले.