- December 24, 2024
- No Comment
यूएएन सक्रियता, बँक-आधार जोडणी साठीची मुदत वाढवली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं युएनए क्रमांक सक्रिय करण्याची तसंच कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ ऑनलाईन मिळवण्यासाठी आवश्यक बँक खातं आधारची जोडणी यासाठीची मुदत आता १५ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.
या आधी ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत होती. पण, आता हा महिना संपता संपता ईपीएफओ कार्यालयाने ही मुदत वाढल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे ही कामं आधी केली नसली तर तुम्ही जानेवारीपर्यंत करू शकता.
युएएन क्रमांक म्हणजे यूनिवर्जल अकाऊंट नंबर. ईपीएफओचे सदस्य झाल्यावर संस्था तुम्हाला १२ आकडी युएएन क्रमांक लागू करते. तुमचे सगळे व्यवहार या क्रमांकावर होतात. बँकेचा खातेक्रमांक असतो तसाच हा नंबर आहे. तुम्हाला ईपीएफओ खात्यातील कुठलेही व्यवहार ऑनलाईन करायचे असतील तर त्यासाठी तुमचा युएएन क्रमांक सक्रिय असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर खात्यातून पैसे काढणे, संपर्काचा पत्ता बदलणे, तुमची शिल्लक रक्कम तपासणे अशी कुठलीही कामं ऑनलाईन होऊ शकत नाहीत.
तुमच्या ईपीएफओ खात्याशी तुमचं बँक खातं जोडलेलं असतं. हे खातं आधारशी जोडणं अनिवार्य आहे. ऑनलाईन व्यवहारांनंतर तुमच्या खात्यातील पैसे या बँक खात्यात जाणार असतात. पण, ते आधारशी जोडलेलं नसेल तर हा व्यवहार पूर्ण होणार नाही. ही जोडणीची मुदतही १५ जानेवारीपर्यंत आहे.
युएएन सक्रिय असणं आणि बँक खातं आधारशी जोडलेलं असणं या गोष्टी सरकारच्या ईएलआय योजनेचा लाभ घेण्यासाठीही बंधनकारक आहेत. अलीकडेच केंद्रीय अर्थसंकल्पात ईएलआय ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्यांना नवीन नोकरी लागली आहे. आणि ज्यांनी पहिल्यांदाच ईपीएफओ खातं उघडलं आहे, अशांना त्यांच्या पहिल्या पगाराइतकी रक्कम तीन हप्त्यांमध्ये सरकारकडून मिळते. तेवढी रक्कम त्या व्यक्तीच्या पीएफ खात्यात जमा होते. त्यासाठी ईपीआय योजना सुरू करण्यात आली आहे. पण, त्यासाठी तुमचं बँक खातं आधारशी जोडलेलं असणं आवश्यक आहे.