- December 25, 2024
- No Comment
किरकोळ कारणावरून दोन गटात मोठा वाद ! एकमेकांवर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, काळेवाडी पोलिसांनी केली सहा जणांना अटक
पिंपरी: अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले होते.त्याची नुकसान भरपाई देण्यावरुन दोन गटात धुम्रचक्की उडाली. एकमेकांवर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला.
पोलिसांनी एकमेकांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केली आहे.
याबाबत अक्षय दिलीप भोसले (वय २८, रा. पवारनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी धीरज धर्मराज यादव (वय २७, रा. पवनानगर कॉलनी, काळेवाडी), हॅपी सुरेंद्रसिंग सदु (वय ३१, रा. सदगुरु निवास शगुन चौक, पिंपरी), अक्षय विकी मंदान (वय २७, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबानगर, काळेवाडी), अशप्रीतसिंग सिंग शहानी (वय २४, रा. स्रेह कॉलनी, काळेवाडी), हरिष वाशु भाटिया (वय २४, रा. गेलाई चौक, जे एन रोड, पिंपरी) यांना अटक केली आहे. त्यांच्या तिघा मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काळेवाडीतील पवारनगर येथील गल्ली नं. १ च्या प्रवेशद्वाराजवळ रविवारी पहाटे दीड वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात किरकोळ अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले होते. फिर्यादी यांनी नुकसान भरपाई मागितली. त्याचा राग मनात धरुन धीरज यादव याने त्याच्या मित्रांना बोलावून फिर्यादी यांना लाकडी बांबुने प्लॅस्टिकच्या बादलीने मारहाण केली. त्यांना वाचविण्यासाठी आलेला त्यांचा भाऊ अनुप भोसले व मित्र प्रणव गवळी यांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक नलावडे तपास करीत आहेत.
त्याविरोधात हरीष वाशु भाटिया (वय २४, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) याने काळेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनुप दिलीप भोसले (वय २५, रा. काळेवाडी) याला अटक केली असून त्याचा भाऊ अक्षय भोसले व प्रणव गवळी यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
धीरज जाधव व हॅप्पी संधु यांच्याकडून अपघातात अनुप भोसले यांच्या मोटारसायकलच्या इंडिकेटचे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई न दिल्याचा राग येऊन तिघांनी लाकडी बांबुने हरिष भाटिया याच्या डोक्यात तसेच मित्र हॅप्पी, अक्षय, आशु, मिंट्या, रमिज व अश्रफ यांच्या हातापायावर मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.