- December 31, 2024
- No Comment
अल्पवयीन गुन्हेगाराची तरुणाला धमकी देत केले कोयत्याने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मी आताच जेलमधून सुटून आलो आहे, तु जास्त उड्या मारु नकोस, नाही तर तुला बघतो, असे म्हणून अल्पवयीन गुन्हेगाराने साथीदारांसह तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जबर जखमी केले.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर १७ वर्षाच्या अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सागर बाळु मावस (वय २३, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदित्य कुंडलीक साखरे (वय २१, रा. कोंढवा खुर्द), महेंद्र गंगाराम आहुजी (वय २२, रा. मार्केटयार्ड) आणि विश्वास कनगरे (वय १९, रा. बिबवेवाडी) यांना अटक केली आहे. ही घटना मार्केटयार्ड येथील प्रेमनगरमध्ये २९ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र महेश कुवर हे प्रेमनगर येथे आले असताना आरोपी तेथे आले. तेव्हा १७ वर्षाचा अल्पवयीन गुन्हेगार फिर्यादींच्या मित्रास म्हणाला, मह्या मी आताच जेलमधून सुटुन आलो आहे. तू जास्त उड्या मारु नकोस, नाही तर तुला बघतो, असे म्हणाला. त्यावर महेश आदित्यला म्हणाला की, भाऊ तू काय म्हणतो, हे मला माहित नाही. असे म्हणताच आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी खाली पडले असताना विश्वास याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या नडगीवर मारुन फिर्यादीस गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.