- January 2, 2025
- No Comment
पुण्यातील धक्कादायक घटना, आपल्या मुलीची एका मुलासोबत मैत्री, संतापलेल्या वडील अन् भावाने तरुणाला क्रूरपणे संपवलं
वाघोली (पुणे): पुण्यातून वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून मुलीच्या वडील आणि दोन भावांनी मिळून एका 17 वर्षीय तरुणाची लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आपल्या लेकीसोबत बोलत असल्याचा रागातून बापाने आणि सख्ख्या भावांनी मिळून त्याचा निर्घृणपणे खून केला. गणेश तांडे असं हत्या झालेल्या 17 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
काल (बुधवारी) रात्री 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारात वाघोलीतील वाघेश्वर नगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या बापासह, दोन्ही भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नितीन पेटकर (31 वर्ष), सुधीर पेटकर (32 वर्ष ), लक्ष्मण पेटकर (60 वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेश तांडे आणि लक्ष्मण पेटकर यांची मुलगी यांच्यात मैत्री होती. दोघेही एकमेकांसोबत बोलत होते. मात्र, हे लक्ष्मण पेटकर यांना आवडत नव्हतं. त्याचा राग मनात धरत त्यांनी गणेशचा जीव घेतला.
मृत गणेश रोजच्याप्रमाणे मित्रासोबत वाघेश्वर नगर परिसरात फिरत होता. त्यावेळी आपल्या मुलीसोबत आणि बहिणीसोबत बोलत असल्याचा आणि त्यांच्यात मैत्री असल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून गणेश तांडे याचा मध्यरात्री दगडाने ठेचून आणि रॉडने मारहाण करून निर्घृणपणे खून केला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण पेटकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.