- January 7, 2025
- No Comment
रद्दी व्यावसायिकाकडे 70 लाखाची खंडणी मागणारा अटक, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाची कामगिरी
पुणे: शहरातील एका बड्या रद्दी व्यावसायिकाला 70 लाखाची खंडणी मागून ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एकाला अटक केली आहे.
तो रद्दी व्यवसायीकाकडे अगोदर कामाला होता. मात्र कामावरुन आणि पगारावरुन वाद झाल्याने त्याने नोकरी सोडली होती. मालकाला धडा शिकवण्यासाठी त्याने पत्नीच्या मोबाईलवरुन फोन करुन खंडणी मागीतली होती.
मितीन देवलाल सरोज ( वय ३१, रा. ग्राम बभनपुर तहसिल सोराम, जिल्हा अलाहबाद, राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. लोहियानगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो सध्या एका किराणा मालाच्या दुकानात कामाला आहे.
याप्रकरणी सुरज बागमार यांनी फिर्याद दिली होती. त्यांना अनोळखी मोबाईल नंबरवरुन एक कॉल आला होता. कॉल करणाऱ्याने 60 ते 70 लाख रुपयांची खंडणी मागून पैसे न दिल्यास त्यांना व त्यांच्या परिवाराला जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुन्ह्याचा समांतर तपास युनिट एकच्या पथकाकडून सुरु होता. तांत्रीक तपास व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनूसार फोन करणारा सरोज हा सोमवार पेठेतील एका दुकानात कामाला असल्याची खबर अंमलदार शुभम देसाई यांना मिळाली. यानूसार सरोजला ताब्यात घेण्यात आले. त्याने प्राथमिक चौकशीत बागमार यांच्याकडे काम करत असताना त्यांच्याशी पैशांवरुन झालेल्या वादातून हे कृत्य केल्याचे सांगितले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार शुभम देसाई, निलेश साबळे व विठ्ठल साळुंखे यांचे पथकाने केली आहे.