- January 7, 2025
- No Comment
हनुमान टेकडीवर पुन्हा जोडप्याला लुटण्याचा प्रकार ! कोयत्याचा धाक दाखवून युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी केली लंपास

पुणे: बाणेर, पाषाण टेकडी हनुमान टेकडी, वेताळ टेकडी येथे फिरायला गेलेल्या जोडप्याला लुटण्याचे प्रकार वारंवार मधून अधून घडत असतात. रात्री उशिरा फिरायला गेलेल्या तरुणीवर बोपदेव घाटात अत्याचार करण्याची घटना ताजी असताना हनुमान टेकडीवर भर दुपारी एका जोडप्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले.
याबाबत खडकी बाजार येथील एका १७ वर्षाच्या युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हनुमान टेकडीवरील ओपन जिमजवळ ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती ही तिच्या मित्रासह हनुमान टेकडीवर दुपारी फिरायला गेली होती. टेकडीवरील ओपन जिमजवळ ते आले असताना चोरट्याने तिला कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण केली. तिच्या गळ्यातील एक लाख रुपयांची २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने चोरुन नेली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त साईनाथ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे निरीक्षक प्रसाद राऊत यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.




