- January 8, 2025
- No Comment
वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरीवर पाणी? पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई

पुणे: मागासलेल्या विचारसरणी पायी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना सरकारी नोकरीला मुकावं लागल्याचं बोललं जातं आहे.दोन मुली जन्मल्यानंतर वंशाला दिवा हवा, या बुरसटलेल्या विचारसरणीत शासकीय अधिकारी ही मागे नसल्याचं चित्र दिसून येत आहे.
समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगटांना तीन अपत्य असल्या कारणाने सेवेतून कमी करण्यात आलं आहे. या तीन अपत्यांमध्ये पहिल्या दोन मुली आणि तिसऱ्या मुलाला जन्म दिल्याचं आता समोर आलेलं आहे. यामुळं शासकीय अधिकारी सुद्धा मागासलेल्या विचाराला खतपाणी घालत असल्याचं यातून सिद्ध होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ही लाजिरवाणी बाब आहे. त्यांच्यावरती कारवाई करत त्यांना नारळ देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड येथील समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना तिसरं आपत्य जन्माला घालणं चांगलंच भोवल्याचं दिसून येतंय. तिसरं अपत्य जन्माला घातल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी श्रीनिवास दांगट यांच्यावर कारवाई करत कामावरून कमी केलं आहे. श्रीनिवास दांगट असं कारवाई केलेल्या सहाय्यक आयुक्तांचं नाव आहे, ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त पदावर काम करत होते. मात्र, तिसरे अपत्य जन्माला घातल्यामुळे त्यांच्या नोकरीवरती गदा आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 1 जुलै 2005 च्या परिपत्रकानुसार 28 मार्च 2006 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असल्यास संबंधित उमेदवाराचा नेमणुकी करीता विचार केला जाणार नाही. शंभर रूपयाच्या स्टॅम्पवर नोटराईज केलेले अपत्याबाबतचे प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. मात्र, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी रूजू होताना तसे प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते. त्यांच्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती.
त्या चौकशीमध्ये दांगट यांना तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याने श्रीनिवास दांगट यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळून आले आहेत. स्वतः श्रीनिवास दांगटांनी याबाबतची कबुली दिली आहे. त्यानंतर विविध कारणे पुढे करून त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर, महापालिका सर्वसाधारण सभेच्या अधिकाराच्या अंतर्गत श्रीनिवास दांगट यांना महापालिका सेवेतून कमी करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. तसे आदेश आयुक्त सिंह यांनी काल (मंगळवारी दि.7) काढले आहेत.
लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाऱ्या विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांनी 28 मार्च 2005 नंतर तिसरे अपत्य झाल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे लहान कुटुंब नियम 2005 हा नियम 28 मार्च, 2005 रोजी राज्यात लागू केला आहे. त्यानुसार दोन मुलांपेक्षा अधिक मुले असणारी व्यक्ती राज्य सरकारच्या नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहे.