- January 9, 2025
- No Comment
घरगुती वादात जावयाकडून सासूला मारहाण,मेव्हुणीवर चाकू हल्ला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
वाघोली: सासुला तू माझ्या घरातून निघून जा, असे म्हणून तिला हाताने मारहाण केली. तेव्हा मध्ये पडलेल्या मेव्हणीवर चाकूने वार करुन जखमी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जावायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावई रोशन डेव्हिड मंडलिक (वय-३९, रा. वाघोली-केसनंद रोड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सासू पुष्पा वामन शेलार (वय-६५, रा़. वाघोली, केसनंद रोड, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांची लहान मुलगी वैशाली हिच्या घरी रहात होत्या. जावई रोशन याला ते आवडत नव्हते. तो घरी आल्यानंतर त्याने सासुला, तू माझ्या घरी कधीपर्यंत राहणार आहे. तू माझ्या घरातून निघून जा, असे म्हणून सासुला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तेव्हा फिर्यादी यांची मोठी मुलगी दिपाली ही त्यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडली.
तेव्हा रोशन याने तिला शिवीगाळ करुन तू मध्ये का आलीस, असे म्हणून घरात जमिनीवर पडलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने मुलीच्या डाव्या हाताच्या दंडावर मारुन तिला जखमी केले. फिर्यादी या त्याच्या हातातून चाकू काढून घेत असताना फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली. यानंतर सासुने लोणीकंद पोलीसात फिर्याद दिली.