- January 10, 2025
- No Comment
कीरकोळ वादात फायटर घेऊन आला अन्… पुण्यातील कुटुंबाला रक्तबंबाळ होईस्तोवर मारहाण
पुणे: पुण्यात क्षुल्लक कारणावरून मारहाण, हल्ले, गोळीबार या घटना मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अशातच पुण्यातील मुंढवा भागात वाहतुकीच्या दरम्यान एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे.
हा प्रकार केवळ ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे घडला असून, हल्लेखोरांनी फायटरने वार करत हल्ला केला. या घटनेने पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. ट्रॅफिकमध्ये असताना हॉर्न का वाजवला म्हणून दोन जणांनी मारहाण करत गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी तात्काळ दोघां जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार काल रात्री नऊ वाजता मुंढवा कोरेगाव पार्क रोड परिसरात घडला आहे. फिर्यादी राजेश वाघचौरे हे त्यांच्या परिवारासोबत कोरेगाव पार्क दिशेने जात असताना मुंढवा कोरेगाव पार्क रोडवर एका ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने पुढील गाडीला हॉर्न दिला. या गोष्टीचा राग आल्याने पुढे असलेल्या राजू गायकवाड आणि त्यांच्या मुलगा शुभम गायकवाड याने गाडीतून उतरत वाघचौरे यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांच्या जवळील फायटरने त्यांच्यावर हल्ला केला. इतकंच नाही तर सोबत असलेल्या कुटुंबियांवर सुद्धा त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात राजेश नाथोबा वाघचौरे त्यांच्या पत्नी सुवर्णा राजेश वाघचौरे आणि मुलगी संस्कृती राजेश वाघचौरे हे तिघे ही जणं जखमी झाले आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांना अटक केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी राजेश नाथोबा वाघचौरे, वय 50 वर्षे, सुवर्णा राजेश वाघचौरे, संस्कृती राजेश वाघचौरे, रा. कोरेगाव पार्क यांना शुभम गायकवाड व राजू गायकवाड या दोन इसमांनी फायटर सारख्या हत्याराने व शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाघचौरे यांच्या गाडीवर मोठा दगड मारला. काच फोडली व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांची मुलगी संस्कृती वाकचौरे व त्यांची मिसेस सुवर्ण वाकचौरे यांना सुद्धा बेदम मारहाण केली. त्यांच्या छातीवरती बुक्क्या मारून पोटात लाथा मारून बेदम मारहाण केली. ही घटना मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा आणि डीबीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्य आरोपी शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे, पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.