- January 11, 2025
- No Comment
अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणात आरोपीला पोक्सोच्या विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर
पुणे: अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध ठेवल्याने त्यातून ती गर्भवती झाली. तिने मुलाला जन्म दिला. पोक्सोच्या या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी हा निकाल दिला आहे.
ओम किशोर राऊत (वय २१, रा. नाना पेठ) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत एका १७ वर्षाच्या युवतीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिचे आणि आरोपी ओम राऊत याच्याशी २ वर्षांपासून मैत्री होती. त्याचे प्रेमसंबंधात रुपांतर झाले. त्याने लग्नाचे आश्वासन देऊन या युवतीशी शारीरीक संबंध ठेवले. त्यातून ही युवती गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद करण्यात आली. पोलिसांनी ओम राऊत याला अटक केली होती.
याप्रकरणी अॅड. प्रसाद रेणुसे यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात आरोपी आणि पीडित अल्पवयीन युवतीचे गेले २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपीवर केलेले आरोप बिनबुडाचे व खोटे आहेत, असा युक्तीवाद आरोपीचे वकील अॅड. प्रसाद रेणुसे व अॅड. स्वरुप जगताप यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.