- January 11, 2025
- No Comment
रहाटणीत टोळक्याने माजवली दहशत तरुणावर चाकू, कोयत्याने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी: जुन्या भांडणाच्या वादातून चाकूने, कोयत्याने तरुणावर वार करून पाच जणांच्या टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रहाटणीतील आकाशगंगा सोसायटीच्या मोकळ्या मैदानाजवळ घडली.
याप्रकरणी मन्सूर मेहबूब शेख (वय २४, रा. गजानननगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सूरज प्रकाश पिंगळे (वय- २४, रा. गजानननगर, रहाटणी) व शुभम अभिमान जाधव (रा. गुजरनगर, थेरगाव) या दोघांना अटक केली आहे तर बप्पा सातपुते, दीपक सातपुते, वैभव पहाडे (तिघेही रा. थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी व आरोपी सूरज पिंगळे यांच्यात एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. दरम्यान, बुधवारी (ता. ८) फिर्यादी व त्यांचा मित्र प्रसाद चव्हाण हे कोकणे चौक येथे उभे असताना त्यांना सूरज याने बोलावून घेतले. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून, इतर साथीदारांना बोलावून घेत फिर्यादी मन्सूर शेख यांना मारहाण केली. ‘ तू काय इथला भाई झालाय का, मी इथला भाई आहे, माझी दहशत माहीत नाही का तुला’ असे म्हणत बप्पा सातपुते याने मन्सूर यांच्यावर चाकूने वार केला. तर दीपक याने त्याच्या हातातील कोयत्याने वार केला. तसेच आरोपी वैभव याने तलवारीने वार केला. मात्र, तो फिर्यादीने चुकवला. फिर्यादीचा मित्र प्रसाद चव्हाण हा फिर्यादीला वाचवण्यासाठी आला असता, त्याच्यावरही आरोपी सातपुते याने वार केला.




