- January 11, 2025
- No Comment
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; कर्वेनगरमधील बंगला फोडून लाखोंना घातला गंडा

कर्वेनगर (पुणे): पुण्यातील कर्वेनगर परिसरातील बंगला फोडून चोरट्यांनी २ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कर्वेनगर येथील वेदांतनगरी परिसरात तक्रारदार यांच्या वडिलांचा बंगला आहे. तेथे वडीलांकडील कुटुंबीय राहतात. दुमजली बंगल्यात पाठिमागच्या बाजूने चोरटे आत शिरले. त्यांनी तक्रारदारांच्या वडिलांच्या व काकाच्या बेडरूममधील कपाटातून दोन लाख ४० हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.
यासोबतच नगर रस्त्यावरील कोलवडी गावात घरातून चोरट्यांनी ९० हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. कोलवडी गावात तक्रारदारांचे घर आहे. ते शेतकरी आहेत. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडले. कपाटातील दागिने आणि रोकड असा ९० हजारांचा ऐवज चोरुन चोरटे पसार झाले. सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करत आहेत.
कोंढव्यातील किराणा माल विक्री दुकानात ठेवलेले परदेशी चलन चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात २९ वर्षीय किराणा माल विक्रेते तक्रार दिली आहे. तक्रारदाराचे कोंढव्यात रॉयल बालाजी ट्रेडर्स किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील २०० सौदी रिआल आणि २०० अमेरिकन डॉलर चोरुन चोरटे पसार झालेत. सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर अध्क तपास करत आहेत.




