- January 12, 2025
- No Comment
पूर्ववैमनस्यातून पिस्तूल बाळगणाऱा तरुण गजाआड, गुन्हे शाखेच्या युनिट तीन ची उल्लेखनीय कामगिरी

पुणे: जमिनीच्या वादातून चुलत मामासोबत असलेले वाद तसेच वादातून मामाने दिलेल्या धमकीमुळे तसेच बदला घेण्याच्या उद्देशाने पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणात त्याला पिस्तूल मिळण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाही पकडले आहे.
आकाश बळीराम बिडकर (वय २४, रा. दत्तवाडी) व सुभाष बाळु मरगळे (वय २४, रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक रंगराव पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.
शहरात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून गस्त व पेट्रोलिंग वाढविली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून गस्त घातली जात असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना माहिती मिळाली की, आकाश बिडकर याच्याकडे पिस्तूल असून, तो बदला घेण्याच्या इराद्याने पिस्तूल घेऊन फिरत आहे. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक रंगराव पवार आणि त्यांच्या पथकाने आकाश याला पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक काडतूसे जप्त केले.
चौकशीत त्याने हडपसरमधील एका गुन्हेगाराकडून सुभाष मरगळे याच्या मध्यस्थीने घेतल्याची माहिती समोर आली. नंतर पोलिसांनी सुभाष मरगळे याला पकडले. दोघांकडे चौकशीतून चुलत मामाच्या जमिनीच्या वाद-विवादातून पिस्तूल बाळगल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.