- January 13, 2025
- No Comment
फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी पोलिसांची लोणावळ्यात कारवाई

वारजे: जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी
सह साथीदारांवर मोक्का कारवाई केली.
त्यातून तो जामीनावर सुटल्यानंतरही त्याची गुन्हेगारी थांबत नसल्याने त्याला तडीपार केले. तरीही तो पुणे शहरात येऊन गुन्हे करत होता. शेवटी त्याच्यावर एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. तेव्हापासून गेले महिन्याभर तो फरार होता. शेवटी वारजे माळवाडी पोलिसांनी त्याला लोणावळ्यात जेरबंद केले.
अभिजित ऊर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय २४, रा. जाधव चाळ, काकडे पॅलेस समोर, कर्वेनगर) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येळवंडे याला एक वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश ४ डिसेंबर २०२४ रोजी काढला होता.
अभिजित येळवंडे व त्याच्या साथीदारांनी ५ जून २०२१ रोजी रवींद्र तागुंदे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता. या गुन्ह्यात येळवंडे व त्याच्या तीन साथीदारांना अटक होऊन मोक्का कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात तो २१ नोव्हेंबर २०२३ रोजी जामीनावर बाहेर आला होता. आल्या आल्या त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, पोलीस अंमलदार खिलारी व तळेकर यांनी प्रस्ताव तयार करुन तो धोकादायक व्यक्ती बनला असून त्याच्या हालचालीमुळे कर्वेनगर परिसरात शांततेत चाललेल्या जनजीवनात वारंवार अडथळे निर्माण होत असल्याचा तडीपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांना सादर केला. त्याची पडताळणी करुन संभाजी कदम यांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी त्याला पुणे जिल्ह्यातून २ वर्षाकरीता तडीपार केले.
तडीपार कालावधीतही तो विनापरवाना पुणे शहरात प्रवेश केल्याने त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला. त्याला स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव तयार करुन तो पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सादर करण्यात आला. पोलीस आयुक्त यांनी त्याला ४ डिसेंबर २०२४ रोजी एक वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश काढला. परंतु, तेव्हापासून तो फरार झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. येळवंडे याच्या हालचालीविषयी लक्ष ठेवून त्याला पकडण्याची योजना तयार करण्यात आली.
तो लोणावळा परिसरात ठिकाणे बदलून रहात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार योगेश वाघ,
शरद पोळ यांनी लोणावळ्यात जाऊन ९ व १० जानेवारी अशा दोन्ही दिवसभर त्याचा परिसरात शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे, पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश बडाख
यांच्या मार्गर्दनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, पोलीस अंमलदार योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, प्रशांत चव्हाण, रियाज शेख, विजय खिलारी, किरण तळेकर यांनी केली आहे.