- January 14, 2025
- No Comment
धक्कादायक! लोणी काळभोर मधे आढळला तरुणाचा मृतदेह; कारण अस्पष्ट

लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथे एका तरुणाचा मृतदेह लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जुन्या सकट वस्तीच्या परिसरात असलेल्या एका पडीक खोलीत लटकलेल्या अवस्थेत रविवारी (ता.12) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे.
आकाश चंद्रकांत पवार (वय-26, रा. तरवडी-रानमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश पवार हा लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहतो. आकाशला मद्यासह अमलीपदार्थाचे व्यसन होते.
दरम्यान, जुन्या सकट वस्ती परिसरात अनेक खोल्या असून त्या सध्या पडीक अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी एक तरुण रविवारी (ता.12) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेला होता. तेंव्हा त्याला आकाश हा दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सबंधित तरुणाने या घटनेची माहिती त्वरित लोणी काळभोर पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने आकाशला खाली उतरविले. व पुढील उपचारासाठी लोणी काळभोर परिसरातील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
आकाशच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसले तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. आकाशाच्या लटकलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.




