- January 17, 2025
- No Comment
नकली नोटा वटविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका अटक.त्यांच्याकडून १० लाख ३५ हजार रुपयांच्या २०७० नकली नोटा हस्तगत

पुणे : नकली नोटा वटविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका जणाला सहकारनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या २५० नकली नोटा आढळून आल्या होत्या. या नकली नोटांचे मुळ शोधत असताना पोलिसांनी तब्बल ५ जणांना अटक करुन त्यांच्याकडून १० लाख ३५ हजार रुपयांच्या २०७० नकली नोटा हस्तगत केल्या आहेत. आरोपी हे मुळचे उत्तर प्रदेशचे राहणारे असून त्यांना दिल्लीतून या नकली नोटा सप्लाय केला जात असल्याचे आढळून आले आहे. निलेश हिरानंद वीरकर (वय ३३, रा. चिंचवड), सैफान कैयुम पटेल (वय २६, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), अफजल समसुद्दीन शहा (वय १९), शाहीर जक्की कुरेशी (वय २५, रा. कोपरखैरणे), शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अन्सारी (वय २२, रा. नालासोपारा पूर्व, पालघर, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व महेशा मंडलिक यांना पाहून एक जण गडबडीत बसस्टॉपवरुन निघून जाऊ लागला. पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याचा हात सतत खिशात जात असल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात ५०० रुपयांचे बंडल मिळाले. रात्रीच्या वेळी अंधारात तो या
नकली नोटा वठविण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने निलेश वीरकर याला घेऊन कोपरखैरणे येथे घेऊन गेले. वीरकर याला शाहीर कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा यांनी या नोटा दिल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी सैफान पटेल, अफजल शहा यांना अटक केली. त्यानंतर २२ ऑक्टोबर २०२४ रोजी शाहीद कुरेशी याला नवी मुंबईतून अटक केली. शाहीद कुरेशी याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला नकली नोटा शाहफहड अन्सारी याच्याकडून आल्याची व त्याच्याकडे आणखी नकली
नोटा असल्याची माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी शाहफहड अन्सारी याला अटक केली. या पाच जणांकडून १० लाख ३५ हजार रुपयांच्या २०७० नकली ५०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. अन्सारी याच्याकडे तपास केल्यावर या नकली नोटा त्याने दिल्ली तसेच उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथून आणल्याचे सांगितले. त्या अनुशंषाने सहकारनगर पोलिसांचे पथक दिल्ली येथे गेले परंतु, तोपर्यंत संशयित तेथून फरार झाले होते.




