- January 17, 2025
- No Comment
जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडल्याने सरस्वती विद्यालयावर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मालमत्ताकर न भरल्याने पवारवस्ती, कुदळवाडी, चिखली येथील सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल अॅण्ड कॉलेजची मालमत्ता सील करून जप्त करण्यात आली होती. ते सील तोडून आतमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी सुरेश विठ्ठल जाधव (रा.चिखली) यांच्यावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करसंकलन विभागाच्या वतीने मालमत्ताकर वसुलीसाठी विविध मोहीम राबवल्या जातात. मालमत्ताधारकांना कर भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात येते. वेळप्रसंगी नोटीस देण्यात येते. मात्र, त्यानंतरही मालमत्ताकर न भरल्यास मालमत्ता जप्त करून ती सील करण्यात येते. जप्त केलेल्या मालमत्तेचे सील अनधिकृतपणे तोडून मालमत्तेत प्रवेश केल्याचा प्रकार चिखली येथे घडला आहे. पवारवस्ती, कुदळवाडी येथे सुरेश जाधव यांची सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल अँण्ड कॉलेज आहे. या मालमत्तेवर एकूण 24 लाख 59 हजार 838 रुपये तर, शास्तीकर 30 लाख 89 हजार 226 रुपये अशी एकूण 55 लाख 49 हजार 64 रूपये थकबाकी आहे. त्यापैकी शास्ती कर वगळून 24 लाख 59 हजार 838 रुपये मालमत्ताकर भरल्यास शास्ती कर माफ होणार आहे.
थकीत कर भरण्याबाबत वारंवार मालमत्ता धारकास वारंवार कळविण्यात आले. बिल भरण्यास टाळाटाळ केल्याने 31 डिसेंबर 2024 ला चिखली कर संकलन कार्यालयाने सदर मालमत्ता जप्त करून सील केली. सुरेश जाधव यांनी सील तोडून 4 जानेवारीला प्रवेश केला. तेथील तोडण्यात आलेले नळजोड अनधिकृतपणे सुरू केले. याप्रकरणी करसंकलन विभागाच्या चिखली विभागीय कार्यालयातील सहाय्यक मंडलाधिकारी बाळू लोंढे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भारतीय न्याय संहिता 2023 कलम 329 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, करसंकलन विभागज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यांना वारंवार नोटीस देऊनही ते थकबाकी भरत नसतील, तर अशा मालमत्ता जप्त करून सील करण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांचे सील तोडल्यास संबंधित व्यक्ती आणि संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.