- January 18, 2025
- No Comment
शेतकऱ्यांच्या पाणी उपसा मोटारी चोरणारी टोळी गजाआड, लोणीकंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

लोणीकंद: न्हावी सांडस व परिसरातील गावातील पाणी उपसा मोटारी व ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याचा तारा चोरणाऱ्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी पकडले. तारा विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मागील पंधरा दिवसात १५ मोटार व ट्रान्सफॉर्मर चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी शेतकऱ्यांनी फिर्याद दाखल केली होती. लोणी कंद पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी महेश लक्ष्मण धुमाळ, (वय २९ वर्ष, रा. केडगाव, ता. दौंड) याला ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली देवून साथीदारांची नावे सांगितली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी पथकाच्या मदतीने दौंड परिसरातून सोमनाथ लक्ष्मण जाधव,(वय २७ वर्ष), तुषार संदिप काळे (वय २८ वर्ष ), प्रथमेश बाळासाहेब जाधव (वय १८ वर्ष), शशिकांत शंकर कदम (वय २५ वर्ष) (सर्व रा. केडगाव, दौंड) यांना ताब्यात घेतले.
चोरीचा माल विकत घेणारा भंगार विक्रेता नासिर अहमद खान (वय ३५ वर्षे रा. नाव्ही सांडस फाटा, ता हवेली) यालाही गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २७,५०० रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा हस्तगत करण्यात आल्या.