- January 18, 2025
- No Comment
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन; आरोपी अटक

सिंहगड रोड (पुणे): चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे.
रेश्मा भिकु खुडे (वय ३२, रा.कुटे मळा, मानाजीनगर,नर्हे मुळ रा. वडुज, जि. सातारा) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मुळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. ही घटना नर्हेमधील मानाजीनगर येथील कुटे मळा येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा खुडे हिचे पहिले लग्न झाले होते. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. त्यानंतर तिने कुमार पाटील बरोबर लग्न केले. एक महिन्यांपूर्वीच ते नर्हेमध्ये रहायला आले होते. कुमार पाटील हा सासवड येथील एका लॉजवर कामाला आहे. तो एक -दोन दिवसांनी घरी येत असतो. शुक्रवारी सायंकाळी कुमार कामावरुन घरी परत आला होता. त्यावेळी त्याचे रेश्मा हिच्या चारित्र्याच्या संशयावरुन त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा त्याने रागाच्या भरात रेश्मा हिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळला. त्यात तिचा जागीच मृत्यु झाला.
या दोघांचा आरडाओरडा ऐकून घरमालक तेथे आले होते. त्यांनी घराचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना रेश्मा निपचित पडली होती. हे पाहून त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी कुमार पाटील याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करीत आहेत.